Powered By Blogger

Saturday, February 19, 2011

विश्वचषक - काही प्रसंग काळजावर कोरून ठेवलेले..

मित्रहो,

आजपासून दहाव्या क्रिकेट वर्ल्ड कपची सुरुवात झाली, आताच बांग्लादेशने टॉस जिंकल्याचे ऐकले आणि आम्ही त्या शकीब्याच्या नावाने बोटे मोडत टंकायला बसलो.च्यायला, इंदिरा आ़क्कांनी बांग्लादेशला काय भारताच्या गळ्यात खोडा अडकवायलाच जन्माला घातले की काय असाच आम्हाला प्रश्न पडतो. असो, धोनी आणि कं ला २००७ चे उट्टे काढण्याच्या शुभेच्छा..

आज आपण काही अविस्मरणिय प्रसंगांबद्दल बोलू, जे केवळ माझ्याच नाही, तर तमाम क्रिकेट दर्दींच्या ह्रदयावर अगदी लेण्यांसारखे कोरलेले आहेत.

१. प्रसाद वि. सोहेल
http://www.youtube.com/watch?v=Byl3zrlF4ZE


आहाहा!!!! वेंकटेश प्रसादने त्या उद्दामुद्दीन आमिर सोहेल ची दांडी वाकविली तो हा क्षण. प्रसाद भाऊ, अहो जयसुर्याने तुमची कितीही धुलाई केली असली तरी, केवळ ह्या चेंडूसाठी तुमची शंभर अपराध सुद्धा आम्ही पोटात घालायला तयार आहोत. सोहेल ने खिजविल्यानंतर, हा चेंडू टाकण्यासाठी तुम्ही तुमच्या शरीरात असतील नसतील अशा सगळ्या हाडांमधली ताकद एकवटली होती, ती फर्लांगभर मागे उडत गेलेली स्टंप तेच दाखवत आहे. आम्ही जर कुठल्या कुडमुडेवाडीचेही बादशहा असतो ना तरीही, आमचे अर्धे राज्यसुद्धा तुम्हाला बहाल केले असते. ह्या एका चेंडूने पाकिस्तानच्या उन्मत्त हत्तीला अक्षरशः लोळविले आणि भारताने बघता बघता सामना खिशात घातला..

२. गिब्स वर्ल्ड कप सोडतो
http://www.youtube.com/watch?v=yJAp30jzHdE

हर्शेल गिब्स ने स्टीव्ह वॉ चा झेल नाही सोडला, तर वर्ल्ड कपच सोडला, गिब्स बहुतेक एरंडेलाची बाटली रिचवूनच उभा होता, म्हणूनच इतकी हागीनघाई झाली होती. ऑस्ट्रेलियाला त्यावेळी जिंकायला जवळजवळ १५० धावा हव्या होत्या आणि चार खंदे वीर तंबूत परतले होते. नंतर वॉ साहेबांनी त्यांच्या नेहमीच्याच स्टाईल मधे खेळत अप्रतिम शतक झळकावले आणि संघाला सेमी फायनल मधे घेवून गेले, ह्याला म्हणतात Captain's knock (अझर्या, ऐकतोयेस ना रे?)

३.ऑस्ट्रेलिया वि अफ्रिका १९९९ सेमी फायनल
http://www.youtube.com/watch?v=fxVNtuDKsds&feature=related

हार्टब्रेक, हार्टब्रेक म्हणतात तो हाच का असा प्रश्न पडावा हा तो क्षण. शेन वॉर्नने निम्म्या अफ्रिकन संघाला धूळ चारल्यानंतरही क्लुसनर दादाने श्रीकृष्णाने एका करंगळीवर गोवर्धन उचलावा तसा एकहाती सामना खेचून आणला होता. शेवटच्या षटकात ९ धावा हव्या असताना, ह्या झुलु आयकॉन ने दोन खणखणीत चौकार मारून विजयावर जवळजवळ शिक्कामोर्तब का काय म्हणतात तेही केले होते, आणि मग अचानक तिसर्या चेंडूवर अगदी एखाद्या यजमानाने सत्यनारायणाचा प्रसाद वाटावा इतक्या सहजपणे फिल्डरच्या पुढ्यात बॉल सरकवून हा वेड्यासारखा पळत सुटला, आणि तिकडे तो कर्मदरिद्री डोनाल्ड सुद्धा बूटांना फेविकॉल लावल्यासारखा क्रीझ मधेच चिकटून उभा राहिला, अर्थात बॉल फिल्डरकडे गेल्यावर तो तरि काय करणार म्हणा? येवढ्यात त्या जात्याच कावेबाज ऑसींनी डाव साधला आणि सामना टाय करवून केवळ सुपर सिक्स मधील विजयाच्या जोरावर फायनल गाठली.

४.सचिन शोएब्याला धुतो, २००३ वर्ल्ड कप
http://www.youtube.com/watch?v=kPguR7QoWIk

वा!! वा!! आणि वा!! हा क्षण तमाम भारतीयांनी देवघरातील फोटोसारखा ह्रदयातील मंदिरात जपून ठेवला आहे.. जितके बोलावे तितके थोडे, दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेट क्षण असेच ह्याचे वर्णन करावे लागेल. पहा तरी, सचिनने किती सहज त्त्या शोएब्याचा मात्र १५० कि मी प्रति तास येणारा बॉल प्रेक्षकांमधे भिरकाविला.हा फक्त एक सिक्स नव्हता, तर तो रावळपिंडीचा खराटा, सगळी पाकिस्तानी टीम, पाकिस्तानी चाहते, सगळ्यांच्या तोंडावर एक सणसणीत चपराकच होती, इतकी सणसणीत की त्यामुळे आलेल्या भोवळीतून पाकिस्तान टीम आजतागायत सावरलीच नाही.अरे सच्या, भावा त्यो २००३ चा वर्ल्ड कप आपलाच हुता रे, ऐन वेळी त्या नतद्र्ष्ट बॉलर्स नी माती खाल्ली आणि होत्याची नव्हते केले :(

त्या २००७ च्या वर्ल्ड कप च्या आमच्या काहीच आठवणी नाहीत, तसेही लक्षात राहण्यासारखे त्यात होतेच काय?

यंदाचा वर्ल्ड कप भारतातच होत आहे, तर करोडोंच्या शुभेच्छा भारतीय संघाच्या पाठीशी आहेतच. मुंबापुरीच्या मैदानात, धोनी आणि संघाने विश्वचषक उंचवावा, हीच सिद्धिविनायका चरणी प्रार्थना :)

No comments: