Saturday, August 18, 2012

मेंदीच्या पानावर - ४

स्थळ - एका आय टी कंपनीचे ऑफिस, शॅंपेन, इल्लिनॉइ, यु. एस. ए.

बाहेर सुरेख स्नो फॉल चालू होता, बाहेरच्या हाडे गोठविणाऱ्या थंडीत, ऑफिस मधली ऊब हवीहवीशी वाटत होती. मी आणि रमेश ग्रीन टी चे कप्स घेवून, खिडकीजवळच्या टेबल वर बसलो.

"मग काय मनिष राव,झालं ना शिफ्टींग व्यवस्थित ह्या वीकेंडला? "
नेहमीप्रमाणे रमेशनेच सुरुवात केली.

"हो, झालं ठीकठाक, अजून थोडं सामान लावणं बाकी आहे, आज संध्याकाळी जावून आवरतो. "

"काही मदत लागल्यास नक्की फोन कर. "

"ओह, ऑफ कोर्स, थँक्स"

आणि मी खिडकीतून, बाहेरच्या पार्क मधील गोठलेल्या लेककडे ट्रान्समध्ये गेल्यासारखा एकटक बघत बसलो.

ह्या वीकेंडलाच मी अगदी अडगळीची खोली शोभेल अश्या डॉर्मिटरी रूम मधून एका ऑफिस जवळच्या स्वस्त पण प्रशस्त अशा स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झालो होतो.

आज उगाचच मन कितीही अडवलं तरी आठवणींच्या मागं पळत होतं. आज एक वर्षाच्या प्रोबेशन नंतर पर्मनंट होवून एक आठवडा झाला होता. युनिवर्सिटीतील मित्रांना बीअर पार्टी साठी एक कारण आणि आयता बकरा सापडला होता. पण मी मात्र उगाचच उदास होतो. अगदी आपला सातशे चा स्कोअर होवून सुद्धा सचिनच जर शून्यावर आऊट झाला तर कसं वाटेल तसंच काहीसं वाटत होतं.

उण्यापुऱ्या तीन वर्षांमागं माझी पहिली नोकरी सोडून केवळ बाबांच्या आग्रहाखातर मी एम. एस. करायला म्हणून शॅंपेन मध्ये आलो. परवडत नसताना सुद्धा, बँकेकडून त्यांनी कसंबसं कर्ज मंजूर करून घेतलं होतं. एकदा का मुलगा परदेशात शिकायला गेला की गंगेत घोडं न्हालं अशीच काहीशी त्यांनी समजूत करून घेतली होती, त्यांच्या कुठल्याश्या साहेबाचा मुलगा ऑस्ट्रेलिया का रशिया कुठून तरी एम. एस. झाला होता, तेव्हापासून हे खुळ त्यांच्या डोक्यात शिरलं होतं.एका सरकारी कचेरीत दुय्यम पोस्ट वर नोकरी करत करत स्वतः अगदी चिंध्या झालेली बनियन त्यांनी वर्षानुवर्षं वापरली, पण मुलांच्या शिक्षणात काहीही कमी पडू द्यायचं नाही हे व्रत पाळलं. फाटकी चप्पल आणि जुनाट हर्क्युलस ची सायकल वापरली, पण कुठलाही क्लास आणि कॉलेजच्या फीस देण्यात कधी कसूर केला नाही. सुदैवाने आई सुद्धा नोकरी करत असल्याने खाण्या पिण्याची ददात कधी आम्हाला पडली नाही.

माझं इंजिनिअरिंग संपवून मी कॅंपस इंटरव्यू मधूनच एका मोठया आय. टी. कंपनीत जॉब करायला सुरूवात केली होती. आता तरी आई बाबाना चार सुखाचे दिवस दिसतील असं वाटत होतं, पण बाबांचं समाधान तेवढ्यानं होणार नव्हतं, मला यु. एस. मधूनच एम. एस. करून आणायचा चंग बांधला होता. लहानपणापासून कधी एक शब्द त्यांना मी उलटं बोललो नाही की कधी कुठला हट्ट केला नाही, त्यांचे कष्ट अगदी जवळून पाहत आलो होतो, बाबांचं मन मला कधीच मोडवलं नाही. झक मारत बऱ्यापैकी मार्कांनी जी. आर. ई पास झालो, काही निवडक युनिवर्सिटीजना अर्ज पाठवले, आणि शेवटी युनिवर्सिटी ऑफ इल्लिनॉइ ला अस्मादिकांची वर्णी लागली. मी नेहमीप्रमाणेच तटस्थ होतो, पण बाबांचा आनंद मात्र थेट पर्वेतीवरून सिंहगडावर पोचला होता. अगदी, माझे ऍप्लिकेशन्स ते व्हीसा इंटरव्यू ते तिकीट बूकिंग एखाद्या नव्या नवरीच्या उत्साहाने त्यांनी हातात घेतले होते. हो-नाही करता करता शेवटी तो दिवस उजाडला. मला मुंबईत एअर पोर्ट वर सोडायला फक्त बाबाच आले होते. तू उगाच तिथे रडून तमाशा करशील असं बोलून त्यांनी आईला यायला मनाई केली होती, खरं कारण होतं की त्यांना तिच्या तिकीटाचे पैसे वाचवायचे होते.तरीही आमच्या मातोश्रींनी घरून निघताना माझ्या हाताला धरून थोडा इमोशनल कार्यक्रम केलाच. तेव्हा, "मुलगा अमेरिकेत शिकायला निघालाय, तिसऱ्या महायुद्धावर नाही पाठवत आहे त्याला, सोडा आता" असं म्हणत मला बाबांनी अक्षरशः ओढून नेलं. एअर पोर्ट वर चेकिंग ला निघण्यापूर्वी त्यांच्या पाया पडणार एवढ्यात त्यांनी मला कडकडून मिठी मारली. "खूप शिक, खूप मोठा हो. " येवढंच बोलून मला निरोप दिला. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान पुरेपूर डोळ्यांत साठवत मी आत शिरलो.

शॅंपेन च्या युनिवर्सिटी मध्ये माझा दिनक्रम सुरू झाला. राहण्याची व्यवस्था माझ्या एजन्सीने आधीच करून ठेवली होती. युनिवर्सिटी हॉस्टेल खूप महाग असल्याने एक डॉर्मिटरीवजा शेअरिंग बेसिस वरचा मोठा हॉल मिळाला होता. एका हॉल मध्ये तीन जण. एक मायक्रोवेव्ह, छोटंसं फ्रिज आणि गॅस शेगडी तिघांमध्ये वापरायला दिलेली होती. माझ्याबरोबरचे दोघे देखील माझ्यासारखेच मध्यमवर्गीय घरामधले. एक तामिळ नाडूचा तर दुसरा बिहारी.मूळचाच लाजरा बुजरा असणारा मी , नवीन देशात, नवीन शहरात अजूनच बुजून गेलो आणि त्यातून ही मरणाची थंडी , पुण्यातल्या थंडीने काकडून जाणारा मी, ह्या असल्या थंडीने भंजाळूनच गेलो. त्यातून अगदी वेगवेगळ्या देशांतून आलेले स्टुडंटस, विशेषतः चीन, कोरिया, थायलंड ह्या तत्सम देशांतले आणि त्यांचे अगम्य ऍक्सेंटस, सततच्या असाईनमेंटस, एक ना अनेक गोष्टी. पण हळूहळू मी माझ्याही नकळत त्या वातावरणात रूळत गेलो. शॅंपेनअगदी छोटंसंच पण सुंदर आणि टुमदार शहर होतं. आखीव-रेखीव रस्ते, शिस्तीत जाणारी वाहनं, मधूनच दिसणारी छोटी छोटी पार्क्स,त्यातली छोटी तळी, त्यांत पोहणारी बदकं, हिरवळीवर खेळणारी लहान मुलं, मोकळ्या जागांवर पद्धतशीरपणे वाढवलेलं गवत, नावालाही न दिसणारी पुसटशीही  धूळ , माझ्यासारख्या रुक्ष माणसालाही ह्या गोष्टी भुरळ घालत.शॅंपेन मध्ये दोन इंडियन शॉप्स सुद्धा होते. तिथूनच आम्ही वीकेंडला खरेदी करायचो. घरी कधी साधा चहा सुद्धा न केलेला मी आता उत्तम स्वैपाक करायला शिकलो , अगदी पनीर टिक्का मसाला पासून मोर कोळंबू पर्यंत काहीही. एक-दोन दा रूम पार्टनर्स च्या आग्रहाखातर पब मध्येही गेलो, पण दारूला स्पर्श करायची हिंमत मात्र कधी झालीनाही. मी युनिवर्सिटी कॅंपस मध्येच एका पिझ्झा शॉप मध्ये पार्ट टाईम जॉब मिळवला,ताशी सात डॉलर मिळणार होते.त्यातून वरचा  खर्च भागणार होता. आता बाबांवर आणखी भार टाकायची माझी इच्छा नव्हती.बघता बघता सहा सात महिने कसे भुर्रकन उडून गेले कळलं सुद्धा नाही. माझी पहिल्या सेमिस्टर ची परीक्षा तोंडावर आली होती. रूमवर सगळीकडे पसाऱ्यात प्रत्येक जण पुस्तकात डोकं खुपसून बसला होता. 

सकाळी एक वाजता त्या स्मशान शांततेचा भंग करत कुणाचा तरी मोबाईल कोकलायला लागला.
"अबे मनिष साले, तेरा फोन बज राहा है, उठा ले."
मी वैतागून फोन उचलला.

"हेलो, कोण मनिष का? "

"हा, बोला"

"अरे मी बाळूमामा बोलतोय. "

ऑ, बाळूमामा आणि आता? 

"हं बोल, काय विशेष? "

"अरे, एक वाईट बातमी आहे. "

वाईट बातमी? माझं ब्लड प्रेशर वाढायला लागलं.

"काय? " मी दबक्या आवाजात विचारलं.

"अरे, म्हणजे, भाऊजी, म्हणजे तुझे बाबा गेले.. "
एखाद्या सुंदर घाटातून गाडी नेताना अचानक एखाद्या खोल दरीतच जावून कोसळावी असं काहीसं वाटलं.

"क क काय? काय बोलतोयेस तू? अरे, काल तर मी त्यांच्याशी बोललो. "

"अरे हो, पण काल रात्रीच त्यांना ऍक्सिडेंट झाला, एका ट्रकने त्यांच्या सायकलला ठोकलं आणि ते ट्र्कखाली आले.... "

माझ्या हातून फोन गळून पडला आणि मी अक्षरशः कोसळलोच.

"अबे, क्या हुवा? "
"वाट हॅपंड म्यान? "

माझ्या डोळ्यांपुढे फक्त आणि फक्त अंधारच नाचत होता.सोमूने, म्हणजे माझ्या बिहारी रूममेटने प्रसंगावधान दाखवून फोन उचलला, आणि कानाला लावला. तो बराच वेळ ऐकत होता.शेवटी फोन बंद केल्यावर, डोळ्यांच्या ओल्या कडा पुसत त्याने कन्ननला खूण केली, दोघे बाजूला जावून अगदी हळू आवाजात काहीतरी पुटपुटले आणि बाहेर आले. कन्ननने पाणी आणून दिले.

शक्य तितका तटस्थ चेहरा करून सोमू बोलला.
"देख भय्ये, तेरे मामजीने तो तुझे बता ही दिया था की क्या हुवा. मै हमेशा के डायलॉग नही मारूंगा. बस्स तुझे ये मेसेज देने केलिये बोला था की, ऍक्सिडेंट के बाद बॉडी की हालत बहुत खराब हो गयी थी, इसिलिये पोस्ट मॉर्टम के बाद जल्दी से अंतिमसंस्कार कर दिया. आंटीजी शॉक मे थी पर फिलहाल ठीक है. अभी तुझे यही पे रुकने के लिये कहा है. तेरा अभी उधर जाना कुछसेन्स नही करता. "

"पर.. "

"अभी पर वर कुछ नही, जल्दीसे लाईटस ऑफ कर के सो जा. कल आंटीजीसे बात कर ले. "

मी एखाद्या मशीन सारखा फक्त इन्स्ट्रक्शन्स फॉलो करत होतो, विचार करायची क्षमताच जणू खलास झाली होती. अशाच अवस्थेत मी उघड्या डोळ्यांनीच झोपी गेलो.दुसऱ्या दिवशी अगदी उसनं अवसान एकवटून आईला फोन लावला, पण तिच्याशी बोलायची हिंमतच होत नव्हती, पण तिचा खंबीर आवाज ऐकून मी चाटच पडलो. तिनेच माझी समजूत काढायला सुरूवात केली आणि निक्षून बजावलं की तू सगळं टाकून इथे परत आलास तर ह्यांना ते कधीच आवडणार नाही. एकंदरीतच तिने येवढं धैर्य कुठून एकवटलं होतं देवच जाणे. मी जास्त काहीच बोलू शकलो नाही. धाकटा गौरव ही बोलला. तो मात्र ओक्साबोक्शी रडत होता. त्याला समजावून, थोडंसं दटावून शांत केलं आणि आईची काळजी घे सांगून फोन बंद केला.डोक्यांत सतरा चिंता आणि डोळ्यांत गोठलेले अश्रू घेवून त्या क्षणापासून खऱ्या अर्थाने माझा प्रवास सुरू झाला.

मी पिझ्झा शॉपमध्ये डबल शिफ्ट स्टार्ट केली, वीकेंडस ना एका लोकल ग्रोसरी स्टोअर मध्ये एका पाकिस्तानी मित्राच्या ओळखीने दिवसभर बिलं फ़ाडायच्या कामाला लागलो. सकाळी पिझ्झा शॉप ची शिफ्टस,दुपारी लेक्चर्स, असाईनमेंटस, संध्याकाळी परत पिझ्झा शॉप,आणि रात्री अभ्यास. वीकेंडला ग्रोसरी शॉप आणि अभ्यास. एखाद्या यंत्राप्रमाणं मी स्वतःला अक्षरशः साच्यात फिट करून घेतलं. मधूनच भुकेची आठवण झाली, तर डॉलर ट्री मधून आणलेलं कसलंसं चायनीज तोंडात कोंबायचो. कधी कधी आई फोनवर म्हणायची सुद्धा की लोकांना काय रे बाबा अमेरिका म्हणजे नुसता पैसा दिसतो, पण कष्ट थोडीच दिसतात. कधीही मित्रांबरोबर नंतर ना पब ला गेलो ना कितीही आग्रह केला तरी कुठल्या पिकनिक ला गेलो. सोमू तर नंतर नंतर मला संन्यासी म्हणूनच हाक मारू लागला. ह्या सगळ्या वातावरणात, मी प्रत्येक सेमिस्टर मात्र चांगल्या मार्कांनी पास झालो, पण २ वर्षांत एकदाही भारतात गेलो नाही. तिकीटाचे पैसे घालवण्यापेक्षा, सुटीत तिथेच राहून काही दिवस फुल टाईम जॉब केला. आणि अशातच एका जॉब फेअर मध्ये, एका फुटकळ इंटरव्यू नंतर ह्या कंपनीचे ऑफर लेटर हातात पडले. पण इथेही एक गोम होतीच, एक वर्षाचे प्रोबेशन होते. बाकी, कुठल्याही कंपनीच्या पॅनेलिस्ट ना माझं तोंड आवडलं नाही, त्यामुळे निमूटपणे ती ऑफर स्वीकारली. कन्नन आणि सोमूला पण जॉब मिळाले, पण ते दोघेही शॅंपेन मधून बाहेर जाणार होते. शँपेन मध्येच राहायला मिळणे ही एकच जमेची बाजू माझ्या नोकरीबाबत होती. दोघांनाही अगदी जड मनाने निरोप देवून मी ही रूम सोडली आणि शेजारच्याच सिंगल रूम मध्ये शिफ्ट झालो. मला एखादे स्टुदिओ अपार्टमेंट परवडत असून सुद्धा तिथे जायचे नव्हते, अजून शिक्षणासाठी घेतलेले कर्ज फेडायला पैसे साठवायचे होते आणि प्रोबेशन संपून पर्मनंट होईपर्यंत मला कुठलीही रिस्क घ्यायची नव्हती. याचाच अजून एक अर्थ म्हणजे भारतात जाणे अजून एका वर्षासाठी लांबणीवर पडणार होते. आईने दोन तीनदा येण्याबद्दल विचारले होते, पण तिनेसुद्धा नंतर फारसा आग्रह केला नाही. मी ह्या एक वर्षांत अगदी कुत्र्यासारखे काम केले, क्लायंट कदून अगदी स्तुतिसुमने उधळून घेण्यासाठी जीवाचे रान केले. पैसे वाचवण्याच्या बाबतीत तर शब्दशः चिंधीगिरी केली. क्वचितच बस किंवा टॅक्सीने ऑफिसला गेलो. जेवणाच्या नावाखाली बऱ्याचदा सिझर सॅलड वर भागवून नेले. तिकडे भारतात आईची नोकरी चालू होती आणि गौरव सुद्धा शिक्षण संपवून नोकरीला लागला होता त्यामुळे त्यांची काळजी मिटली होती. हे वर्ष सुद्धा कसं सरलं नाही, आणि शेवटी तो मच अवेटेड मेल मेलबॉक्स मध्ये येवून पोचला. मी पर्मनंट झालो होतो आणि एक ग्रेड वर सुद्धा चढलो होतो. आमच्या इटालियन मॅनेजर ने केबीन मध्ये बोलवून खास अभिनंदन केले. त्यानंतर दोन दिवसांनी मी मित्रांच्या आणि आईच्या आग्रहापुढे हार मानून स्टुडिओ अपार्टमेंट रेंट वर घेवून टाकले होते.

आज तसं पाहायला गेल्यास लौकिक अर्थानं आनंदाचाच दिवस होता, पण सारखा सारखा आज बाबांचा चेहरा डोळ्यांसमोर येत होता. ज्यांच्यासाठी हा अट्टहास केला तेच आज नाहीत, एखाद्य क्रूर थट्टेसारखं काहीसं वाटत होतं. माझ्या डोळ्यातलं पाणी तर तीन वर्षांमागंच सुकून गेलं होतं, फक्त शून्यात पाहण्याशिवाय ते काहीच करत नसत कधी कधी.

"अरे, कुठं हरवलास? काय विचार करतोयेस", वैतागून रमेश ने हटकलं.

"अं, काही नाही, अरे एक मेल टाकायचीय चल. "

"ओक्के"

मी परत डेस्क वर जावून मॉनिटर मध्ये डोकं खुपसून बसलो.
(क्रमशः)