Saturday, February 9, 2013

एक विमान हरवलेलं...


झी मराठीवर दर शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता मधली सुट्टी नावाचा एक छान कार्यक्रम असतो. सलील कुलकर्णी अँकरींग करतो. वेगवेगळ्या गावांतील शाळांमध्ये जावून तिथल्या विद्यार्थ्यांशी एक सुंदर संवाद साधायचा असे ह्या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. एरवी तो सलील त्याच्या रिअ‍ॅलिटी शोज मधल्या भाषणांनी कधी कधी डोक्यात जातो, पण हा शो मात्र मला मनापासून आवडतो.तर,ह्या आठवड्याच्या भागात, सांगली जवळच्या एका खेडयातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शो होता. सलील चा नेहमीप्रमाणे मुलांशी संवाद सुरू होता. त्याने मुलांना एक प्रश्न विचारला की, तुम्ही सगळे तर लहान गावात राहता, तुम्हाला कधी मोठ्या शहराचे, तिथल्या गोष्टींचे आकर्षण वाटते का? वाटते तर कशाचे वाटते? तेव्हा एका गोड लहान मुलीने तितकेच गोड उत्तर दिले की मला ना मुंबईचा समुद्र खूप खूप आवडतो आणि तिला फक्त एकदा समुद्र बघायला मुंबईला जायचंय.
माझ्या तोंडून लगेच वाह निघून गेला. त्या निरागस मुलीची इच्छा सुध्दा तितकीच निरागस होती. तिला ना मोठमोठ्या बिल्डींग्स चं आकर्षण होतं, ना मॉल्स चं ना मल्टीप्लेक्स चं, ना मॅक्डोनल्ड्स ना पिझा हट चं. तिची स्वप्नं अशीच निरागस राहावीत असंच मात्र मला राहून राहून वाटत होतं.
त्या लहान मुलीने मला चांगलंच अंतर्मुख केलं. तो साधेपणा, तो निरागसपणा कुठेतरी एका कोपर्‍यात बंद करून ठेवलाय आपण. लहानपणी मला असंच टांग्याचं, रेल्वेच्या शिट्टीचं, नदीवरच्या पूलाचं ,त्या पूलाखालून संथपणे वाहणार्‍या कृष्णेचं, गावातल्या लहान मोठ्या वाड्यांचं, आकाशात मधूनच दिसणार्‍या विमानाचं प्रचंड आकर्षण होतं. कधी लांब विमान दिसलं की त्याचा अगदी ठिपका होवून जाईपर्यंत मी जणू त्याचा पाठलाग करत असल्या सारखा पळत जायचो. आज सुध्दा मी पळतच आहे, मीच नाही तर माझ्यासारखे बरेच जण पळताहेत, पण ते ठिपका झालेलं विमान केव्हाच हरवलंय आणि सगळेच जण केवळ दुसरा पळतोय, मग मी सुध्दा पळणार आहे असं म्हणतात आणि पळतात, पण कशाच्या मागे हे मात्र कुणालाच माहित नाही. असं ऊर फुटेस्तोवर आपण धावत राहतो आणि दूर कुठेतरी कोपर्‍यावर आयुष्य आपल्याला खुणावत राहते. मग त्या कोपर्‍यावर आपण बरंच काही सोडून दिलेलं असतं, तिथे असते गल्लीतली हाफ पिच क्रिकेट मॅच, आजीच्या हातचं गरम गरम थालीपीठ, पु.लं ची हसवत हसवत नकळत डोळ्यांत पाणी आणणारी कॅसेट, मित्रांबरोबर करायचा राहून गेलेला तोरणा-राजगडचा ट्रेक, मैत्रिणीसोबत पाहायचा राहून गेलेला सिनेमा, बायकोसाठी आणायचा विसरलेला गजरा, मुलाच्या शाळेतला मिस केलेला गॅदरिंग चा कार्यक्रम असं काही अन् बरंच काही. हातात काहीतरी अनामिक, गूढ पकडण्यासाठी जीवाचा आटापिटा करायचा आणि तोपर्यंत आयुष्यच हातातून कधी निसटून जातं हे समजतच नाही. म्हणूनच मला वाटतं की कधी कधी उगाच काहीतरी लिहायचंच म्हणून पाटी गिचमिड अक्षरांच्या वेड्या वाकड्या डिझाईन्स नी भरवून टाकण्या पेक्षा ती तशीच स्व्च्छ आणि कोरीच ठेवायला काय हरकत आहे.
असो, माझ्या मनातलं ते ठिपका होणारं विमान जसं हरवून गेलं तसा त्या गोड मुलीच्या मनातला, स्वप्नातला अथांग समुद्र कधीच हरवू नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना..

3 comments:

अपर्णा said...

ही पोस्टही खूप छान झाली आहे… तुमची लिखाणशैली आवडली :)

Can you please change your comment settings? Its kind of irritating and time consuming to write that two word cord...agyam googlebabacha... ;)

chilmibaba said...

Thanks Aparna. I will try to change the comment settings.

Yashwant Palkar said...

खूप छान !!!!
मी सुद्धा काही दिवसापूर्वी असाच काहीस लिहील होत…
http://dhyanimani.blogspot.in/2013/01/blog-post_4892.html'