एक हातभर मिनिट्स ऑफ मीटिंग खरडले, आणि आऊटलूक मध्ये सेंड चं बटन क्लिक केलं. हुश्श, त्या इंग्रज क्लायंटाचा आत्मा थंड झाला असेल आता. बास्स, आज तसंही जास्त काम नव्हतंच, बस निघायलाही बराच वेळ होता. बाहेर चांगलंच अंधारून आलं होतं. मोठ्या खिडक्यांच्या काचांवर पावसाचे टप्पोरे थेंब हळूहळू जमा होवू लागले होते. अशा वेळेला मस्त कॉफी प्यायचा मूड होतो. तेजू ऑफलाईन दिसत होती. मी मागे वळून सागरला विचारलं
" काय रे, बिझी आहेस का?"
"नाही गं, बोल ना."
"चल मग, कॉफी घेवूया का?"
"चल "
त्या जुनाट व्हेन्डींग मशीन शी खडखडाट करत आम्ही कॉफी, खरंतर कॉफी फ्लेवर्ड मिल्क घेवून खिडकीपाशी आलो. काचेतून कोसळणारा पाऊस न्याहाळत अगदी मशिन ची कॉफी सुद्धा छान वाटते. काही मिनिटं अशीच गेली.
"तुला पावसात भिजायला आवडतं का गं?", हळूच शांतता भंग करत सागरनं विचारलं.
"अं, ह्म्म, ह्यॅ, आजिबात नाही, पाऊस नुसता पाह्त एन्जॉय करणं वेगळं, पण पावसात भिजणं म्हणजे जीवावर येतं. तुला काय आवडतं की काय?"
"ह्म्म, लहानपणीच आवडायचं, अगदी खूप. आता कुठलं परवडतंय भिजायला. कसं असतं ना, अगदी काल परवापर्यंत हवाहवासा वाटणारा पाऊस जेव्हा एकदम irritating वाटायला लागतो ना, तेव्हा मान्य करावं की आपण म्हातारे होत आहोत."
"हम्म.."
"ए , तुझ्याबरोबर रोज कॅन्टीन मध्ये कोण सॉलिड आयटम असते गं?", अचानक सागरने डोळा मारत विचारलं
एकदम पहिल्या गिअर वरून चवथ्या गिअर वर जावं असं काहीसं मला वाटलं.
"का रे? बरंच लक्ष असतं साहेबांचं. बाय द वे, ती सुद्धा मला विचारत होती, तुझ्या बाजूला कोण तो ढापण्या बसलेला असतो, मोठमोठ्याने फोनवर ओरडत? " मीही चेष्टेच्या मूडमध्ये येत म्हणाले.
"अरे वा, ढापण्या तर ढापण्या, निदान एखाद्या सुंदर मुलीने दखल तर घेतली. ह्या कंपनीत राहिल्याचं सार्थक झालं म्हणायचं, आता मी सुखाने डोळे मिटायला मोकळा."
काहीही असलं तरी ह्याचा खेळकरपणा मात्र वाखाणण्यासारखा होता.
"बरं झालं, कंपनीवरून आठवलं, मी तुला सांगितलं का गं?"
"नाही, काय?"
"अगं मी पेपर टाकलाय. सध्या नोटीस पिरीयड सुरु आहे."
"वा, अभिनंदन, कुठे चाललायेस? आणि कधी आहे लास्ट डे?"
"थॅन्क्स, अजून दोन आठवडे आहे मी तुला त्रास द्यायला."
"काय? दोन आठवडे? आणि तू आता सांगतोयेस? कुठं चालला आहेस हे तरी सांगणार आहेस का?"
मी डोळे मोठे करत विचारलं.
"सिटी ग्रुप"
"वॉव!! मग तर काय, मस्त हाईक मिळाली असेल, ग्रेट, कॉन्ग्रॅट्स. चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे. आता मीच एकटी राहते की काय इथे असं वाटायला लागलंय?"
"तुझं काय जीना यहा, मरना यहा आहे की काय?"
"नाही रे, बघू ह्या अप्राईझल मध्ये काय मिळते ते, त्यावरून मी ठरवेन." मी एक उसासा सोडत माझं दरवर्षीचं स्टॅन्डर्ड उत्तर देवून टाकलं.
"वोक्के, ब्येष्ट ऑफ लक.."
"ठीक आहे,.चल मी निघते, बसची वेळ झाली, बाय, उद्या बोलू."
"बाय"
बाहेर पाऊस वाढतच होता. कशीबशी छत्री बंद करत मी पुढच्या सीटवर बसले.पण सागरशी बोलल्यापासून एकच विचार सारखा मनात घोळत होता. ह्या कंपनीत जवळजवळ चार वर्षे होत आली.माझ्याबरोबर जॉईन झालेल्यांपैकी फक्त मी आणि तेजूच उरलो होतो आता. अगदी सागरसारखे मला ज्युनिअर असलेले लोक सुध्दा सोडून गेले होते, चालले होते. असं नाही की मी बाहेर कुठे प्रयत्न केला नाही. पण, कुठे मनासारखे पॅकेज मिळत नव्ह्ते, तर कुठे मनासारखे काम.आणि चार वर्षं इथं राहून एक प्रकारच्या कम्फर्ट झोन मध्ये आल्यासारखं वाटत होतं, अगदी मागच्या सलग दोन अप्राईझल मध्ये प्रमोशन साठी डावलून सुध्दा. पण असा कुणी ओळखीतलं निघून चाललं की, असं विचारांचं चक्र मनात फिरत राहायचं.मला एक कळत नाही, एखादी ओळखीची व्यक्ती उद्यापासून नसणार ह्याचं दु:ख जास्त असतं की, तुम्हाला का अशी संधी मिळत नाही ह्याचं? आता ह्या वर्षी आर या पार, एकदा बालाशी स्पष्ट बोलून काय तो निर्णय घ्यायचाच असा मी दरवर्षीप्रमाणे निर्णय घेतला.
कानात रेडिओ मिर्चीच्या आर जे ची वायफळ बडबड, बाहेरचा ट्रॅफिक जॅम, जोरात कोसळणारा पाऊस, आणि त्याच्याहूनही वेगाने मनात कोसळणारे विचार, आजूबाजूचे वैतागलेले, झोपाळलेले आणि म्लान चेहरे, मला सुध्दा कधी झोप लागली कळालंच नाही.
(क्रमशः)
3 comments:
waiting for next part!
+1
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत
तोही असाच दर्जेदार असणार ह्यात शंका नाही.
Post a Comment