Powered By Blogger

Sunday, April 24, 2011

मेंदीच्या पानावर - २

"भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वळणावर, या वळणावर.."
इअरफोन्स कानात कोंबून गाणं ऐकता ऐकता माझा डोळा कधी लागला काही कळालेच नाही. अचानक ड्रायव्हरने करकचून ब्रेक दाबला आणि मी दचकून जागी झाले. किलकिले डोळे करत बाहेर पहिल्यावर लक्षात आलं की बस ने भुसारी कॉलनीचा स्टॉप केव्हाच सोडला होता. मी झोपेत थेट पौड फाट्यापर्यंत पोचले होते.

"अरे देवा..." म्हणत मी ताड्कन उठले, कशीबशी बॅग पाठीवर अडकवून, विस्कटलेले केस ठीक ठाक करत मी खाली उतरले.

आता परत आमच्या फ्लॅटवर कसं जायचं? बाहेर पावसाचं चिन्ह होतं, रिक्षावाल्याने चांगलंच कापलं असतं.मग काय, वाट पाहीन पण पीएमटीनेच जाईन म्हणत नाईलाजाने बसची वाट पाहत थांबण्याशिवाय काही पर्याय नव्हता. ह्यादरम्यान मी स्वतःला हजार शिव्या देवून घेतल्या होत्या. पण आज नशीब जोरावर दिसत होतं, संध्याकाळी आठ वाजता चक्क बर्‍यापैकी मोकळी बस मिळाली, पीएमटीचा सौजन्य सप्ताह सुरू असल्याच्या थाटात कंडक्टरने जराही कटकट न करता सुटे पैसे परत केले आणि व्यवस्थित स्टॉपवरच बस थांबवली. मी खुशीतच खाली उतरले. एव्हाना वीजा चमकायला लागल्या होत्या. मी झपाझप पावलं टाकत निघाले, आमची बिल्डिंग रोड पासून थोडी आत होती, आणि आत जाणार्‍या रस्त्यावर कधीकधी अंधार असायचा, मला तेव्हा खूप भीती वाटायची. पाऊस सुरू व्हायच्या आत मी घरी पोचले आणि सुटकेचा नि:श्वास टाकत घरी शिरले. ऋता नेहमीप्रमाणे मोबाईलवरच चिकटलेली होती. तिचं दबक्या आवाजतलं बोलणं ऐकून, मी हळूच तिला डोळा मारला, तिने लगेच जीभ बाहेर काढून दाखविली.

तासाभराने माझं आवरल्यावर, ऋताने जेवायला हाक मारली. आज मावशींनी मस्त भेंडीची भाजी केली होती. आज ऋताचं मात्र जेवणात लक्ष दिसत नव्हतं, नेहमी हिच्या तोंडावर टेप चिकटवावा की काय असं वाटावं अशी अखंड बोलणारी ऋता आज काहीच बोलत नव्हती. मी काही बोलल्यावर सुध्दा अगदी तुटक तुटक उत्तरं देत होती.नक्कीच काहीतरी बिनसलं होतं. मला तिची थोडी काळजीच वाटू लागली होती. ऋता तीन वर्षांपासून माझी रूम पार्टनर होती, तसं तिच्या आणि माझ्यात कॉमन असं काही नव्हतं, तिचा स्वभाव माझ्या अगदी विरूध्द, सतत हसणारी, चेष्टा मस्करी करणारी, कायम मित्र मैत्रिणी, गेट टु गेदर्स, पिकनिक, पार्टीज एन्जॉय करणारी ऋता माझी पक्की मैत्रीण कधी झाली हे समजले सुध्दा नाही. आणि म्हणूनच तिचं गप्प राहणं खटकत होतं, कारण मागच्या वेळी, तिच्या अप्राईजल रिझल्ट नंतर एक दोन दिवस ती अशीच गप्प गप्प होती, पण सध्या तर अप्राईजल सिझन पण नव्ह्ता.
हात धुतल्यावर दोघी हॉलमध्ये बेडवर बसलो. मी लगेच विषय काढला.
"काय ऋताबाई, आज काय झालंय? गोर्‍या गोबर्‍या गालांवर एकही खळी पडली नाही संध्याकाळ पासून"
"काही नाही गं, थोडं डोकं दुखत होतं" उसनं अवसान आणत ऋता बोलली.
"ए ऋते, गप्प बस. खरं सांग, काय मला सांगण्यासारखं नाही का?"
"अगं हा स्वप्नील गं.." बोलता बोलता ऋताचा आवाज अचानक रडवेला झाला.
काहीतरी सिरिअस प्रकार वाटत होता. तसे दोघांचे अधूनमधून रुसवे फुगवे चालायचे, पण ऋताला अशी रडकुंडीला आलेली मी कधी पहिली नव्हती.
"काय झालं, काय म्हणतायेत आमचे भावी भाऊजी, काय खूप उतावळे झालेत की काय?"
मी थोडं वातावरण हलकं फुलकं करण्यासाठी विचारलं?
"अगं काय सांगू? तुला माहितीये ना ह्या वीक मध्ये फुल्ल लोड होता प्रोजेक्ट मध्ये. काल तर गो लाईव्ह होता. रात्री खूप उशीर झाला निघायला. मला माझ्या टीएल नेच घरी सोडलं. बस्स, म्हणूनच ह्याचा पारा चढला. तू त्याच्याबरोबर येवढ्या रात्री आलीसच कशी? असं म्हणत माझ्याशी भांडतोय तो, म्हणतोय की मी काय मेलो होतो का? आता मला सांग, हा काय हडपसर वरून येणार होता का हिंजवडीला मला न्यायला?"
मला पहिल्यांदा ऐकून धक्काच बसला. स्वप्नील सारखा चांगला मुलगा असं काही वागेल यावर माझा विश्वासच बसेना.
"अगं तसं नसेल गं, काहीतरी गैरसमज झाला असेल." मी तिला समजावण्याच्या उद्देशाने म्हणाले.
"नाऽऽहीऽऽ. असं काही पहिल्यांदा होत नहिये. गेले काही दिवस मी पाहतीये, स्वप्नील खूपच पझेसिव्ह होत चाललाय. माझं माझ्या मित्रांशी, कुठल्याही मुलाशी जास्त बोललेलं त्याला खपत नाही, ह्याचा फोन मी चुकून रिसिव्ह केला नाही तरी खुप खोदून खोदून प्रश्न विचारतो. मागच्याच वीकेंडची गोष्ट, आम्ही दोघे डेक्कन च्या मॅक्डी मध्ये बसलो होतो, तिथे माझा कॉलेजचा एक मित्र अथर्व भेटला, मला पाहून अगदी गर्दीतून वाट काढत काढत आमच्या टेबलापाशी आला. फक्त एखाद दुसरा मिनिट होता, फक्त हाय हेलो करून निघून सुध्दा गेला. मग काय, आमच्या साहेबांचा मूड लगेच ऑफ. पूर्ण वेळ फक्त अथर्वचीच माहिती काढून घेत होता, तू त्याला कशी काय ओळखतेस?, तुमची मैत्री अजून आहे का? वगैरे, वगैरे..आता हे गुण आहेत, लग्न झाल्यावर काय होणार आहे कुणास ठावुक?"
बोलता, बोलता ऋताचे गोरे गाल लालबुंद झाले होते. मला तर हे सगळं विचित्रच वाटत होतं. ऋताचं लग्न आईवडिलांनीच ठरवलं होतं. स्वप्नील मला तरी खूप साधा, सरळ, लाजरा-बुजरा मुलगा वाटायचा. तो ऋताला भेटायला यायचा तेव्हा खालूनच बोलून निघून जायचा, चुकून सुद्धा कधी वर यायचा नाही. मला जेव्हा जेव्हा तो भेटला, तेव्हा अगदी अहो, जाहो करून बोलत असायचा, शेवटी मीच ऋताकडून रागवून रागवून अरे तुरे वर बोलणं आणायचे. आणि जे काही ऋताने आज सांगितलं ते ऐकून मी सुन्नच झाले होते. तिला काही तरी समजवायचं म्हणून मी बोलून गेले.
"अगं स्वप्नील चांगला मुलगा आहे. तुमचं लग्न आता दोन महिन्यांवर आलं आहे. काही गैरसमज असतील तर आत्ताच बोलून मिटवून टाका. मला खात्री आहे सगळं व्यवस्थित होईल"
"तसं झालं तर चांगलंच आहे." एक सुस्कारा टाकत ऋता पुटपुटली.
मी तिला समजावत होते खरी, पण कुठेतरी मलाच खुप उदास वाटू लागलं होतं. खरोखर, एकविसाव्या शतकात सुध्दा ही पुरूष मंडळी केवळ पुढारलेपणाचं ढोंग आणतात, आणि आतून मात्र तेवढीच बुरसटलेली आणि मागासलेली असतात, आणि असलं काही ऐकून मला तर ह्या असल्या मुलांचा आणि पुरुषी प्रवृत्तीचा जास्तच तिरस्कार वाटायला लागायचा, आपण पुरुष द्वेष्टे तर बनत चाललो नाही ना अशी उगाचच शंका यायची. मी तशाच मनःस्थितीत उठून बेडरूम मध्ये गेले.कानांत इअरप्लग्स कोंबून संदीप खरेची गाणी प्ले केली आणि डोळा कधी लागला कळालंच नाही..
(क्रमशः)

Friday, April 8, 2011

मेंदीच्या पानावर - १

मी तणतणतच क्युबिकल मध्ये शिरले आणि बॅग जोरात डेस्क वर आदळली.
"काय झालं मॅडम?", आपला जाड फ्रेमचा चष्मा नीट करत सागरने विचारले.
"हे मेलं ट्रॅफिक रे, जरा पुढे सरकेल तर नशीब, नुसता वैताग आणलाय."
"ओक्के, मला वाटलं ब्वॉयफ्रेंडाशी भांडण बिंडण झाले की काय :)"
"हा हा हा, कै च्या कै"
मी खुर्चीत नीट बसतेच आहे तोपर्यंत फोन कोकलू लागला..
"हॅलो"
"हॅलो गवरी, बाला हियर"
बाला, आमचा मद्राशी मॅनेजर, ह्या गाढवाने एकदा तरी माझं नाव व्यवस्थित उच्चारावं अशी माझी कळकळीची इच्छा होती.
"हाय बाला, टेल मी"
"व्हेअर वेअर यू गवरी, आई वाज लूकिंग फार यू"
अरे बोक्या, नेहमी नवाच्या ठोक्याला हजर असते, तर पुसटशी दखल ही घेणार नाही, आणि नेमका आजच टपून बसला होतास.
"सॉरी बाला, बस वॉज लेट टुडे ड्यु टु हेवी ट्रॅफिक"
"न्येव्हर माईंड, क्यान यू कम टु माय ड्येस्क फॉर अ मिनट? वी आर हॅविंग अ क्विक टीम मीटींग"
ह्या बालाला मधूनच टीम मीटींग नावाचा भंपक प्रकार करण्याचा झटका यायचा, ज्यात फक्त तोच काहीतरी अगम्य भाषेत बडबड करायचा आणि बाकिचे आपले हो ला हो करायचे.
आजची मीटींग थोडी जास्त वेळच चालली. बाला स्वतःच काहीतरी पीजे मारून, स्वत:चं थुलथुलीत पोट सांभाळत खदाखदा हसत होता आणि बाकी सगळे निर्विकार चेहर्‍याने माना हलवत होते.
तो मीटींगचा टाईमपास संपवून मी जागेवर आले. सागर महाशय कुठल्याश्या किंगफिशर मॉडेल चे फोटोज अगदी भक्तिभावाने पाहण्यात तल्लीन झाले होते. मी गालातल्या गालात हसत मी मी म्हणणार्‍या मेल्स चेक करायला घेतल्या. बाप रे, सकाळपासून अगदी इश्शुजचा पाऊस पडत होता!!!!

शी बाबा, अर्धा दिवस सरत आला तरी कामात मन काही लागेना. एकापाठोपाठ एक ईश्शुस, डिफेक्ट्स पाठच सोडायला तयार नव्हते. तेजू तीन वेळा पिंग करून कंटाळली आणि एकटीच जेवायला निघून गेली.भरीस भर म्हणून की काय आजूबाजूला हळूच चोरून पाहावे म्हटले तर, पलीकडे बसणारा सुजल सिंग ही आलेला दिसत नव्हता.उंच, गोरापान, वेल बिल्ट, रोज नवीन हेअर स्टाईल ठेवणारा, क्लायंट पुढे फाडफाड इंग्रजी झाडणारा, स्टायलीश बाईक चालविणारा सुजल सगळ्या टीम चा हिरो होता. त्याने नुसते हाय म्हटले तरी मनात गुदगुल्या होत असत.

मी तंद्रीत असतानाच पर्स मधून मोबाईल खणखणल्याचा आवाज आला. घरचा फोन? मी फोन घेवून बाहेर आले.
"हेलो"
"हेलो गौरी, किती फोन करायचा? कुठे होतीस? ", राग, चीडचीड, काळजी अशा मिक्स्ड फीलीन्ग्स वाला आईचा आवाज.
"अगं, फोन पर्स मध्येच राहिला होता, त्यामुळे लक्षात आले नसेल."
"बरं, जेवलीस का?"
"नाही अजून, काम होतं खूप, जाईन आता."
"काय हे गौरी? येवढं काय काम असतं? दोन वाजून गेले, अशाने आजारी पडशील."
आई एकदा बोलायला लागली ना थांबतच नाही.
"अगं जाईन गं आता. बरं ते राहूदे, बाबांची तब्येत कशी आहे?"
"आहे बरी." एक सुस्कारा सोडत आई पुटपुटली.
"डॉक्टरांनी हजारदा सांगितलंय चहा वर्ज्य करा म्हणून, पण हा माणूस ऐकेल तर नशीब. जाऊदे, ते चालायचंच, बरं मी काय म्हणत होते, सुमन वन्स आल्या होत्या काल."
"वा, छान, कशी आहे ती?"
"बर्‍या आहेत, अगं त्या सांगत होत्या, त्यांच्या नणंदेच्या चुलत दीराच्या मावस बहिणीचा मुलगा पुण्यातच असतो. कुठल्यातर सॉफ्ट्वेअर कंपनीत आहे म्हणे. मॅनेजर आहे, एक लाख पगार आहे ."
"बरं मग?", मला हळूहळू गाडी कुठे शिरणार ह्याचा अंदाज येवू लागला होता.
"अगं तुझ्यासाठी विचारत होत्या. चांगले लोक आहेत, शिवाय आपल्या सांगलीचेच आहेत. पत्रिका जमते का ते पाहावे का?"
"आई, काय गं!!! तुला सांगितलं ना, आता बास्स म्हणून. मी कंटाळलेय या सगळ्याला आता"
"असं काय करतेस? येत्या मे मध्ये अठ्ठावीस पूर्ण होतील तुला. म्हातारी झाल्यावर का लग्न करणार आहेस. अशा गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या चांगल्या असतात @@*****क्ष्क्ष्क्ष्क्ष्..."
पुढचं सगळं आता मला व्यवस्थित पाठ झालं होतं- आम्ही काय भल्यासाठी सांगतो, तुझ्या वयाची असताना मी तुला शाळेत सोडायला जात होते वगैरे, वगैरे..
"आई, मला भूक लागली आहे, मला जेवायला जावूदे"
हा रामबाण उपाय नेहमी काम करून जायचा. लेकराला भूक लागलीये म्हटल्यावर जगातल्या कुठल्याही आईचे शब्दसुद्धा घशातच अडकतील.
"बरं बाई, जा. पण मी काय सांगितलंय ते लक्षात ठेव."
हुश्श.. आईला असं दुखावताना मला सुद्धा काही आनंद होत नव्हता, पण काही गोष्टी, काही प्रसंग खूप खोलवर मनात रुतून बसले होते.साधारण दोन-तीन वर्षांपूर्वी हा पाहण्याचा, कांदा पोह्यांच्या कार्यक्रमांचा प्रपंच सुरू झाला होता. कुठे मुलगी नकटीच आहे, जास्त सावळीच आहे, जरा जास्त बुटकीच आहे, तर कुठे मुलाला पगार कमी आहे, थोडा जास्तच उंच आहे, त्याच्या पणजीला कोड होते,तर कुठे मलाच मुलगा अगदी काका सारखा वाटल एक ना अनेक न चे पाढे पाठ झाले होते.आईचे खंडोबा पासून अगदी हाजी अली पर्यंत सगळ्याना नवस बोलून झाले होते. शेवटी एका ठिकाणी रडत खडत का होईना, ठरलं. अगदी साखरपुड्यापर्यंत. पण मधूनच मुलच्या आईने, अहो, काय ही मुलगी, साधी टिकली सुद्धा लावत नाही, असं नाक मुरडायला सुरुवात केली आणि आज्ञाधारक मुलानेही तीच भुणभुण लावली. माझ्याही रागाचा पारा चढला, आणि व्हायचे तेच झाले, सगळं फिसकटलं. तेव्हापासून या सगळ्या प्रकाराची शिसारी आल्यासारखं झालं होतं. हे सो कॉल्ड सुशिक्षित लोक सुध्दा छोट्या छोट्या गोष्टींत मन दाखवताना पाहून तर उबगच आला आणि एक खूणगाठ मनाशी पक्की केली की, आता नो मोअर कांदा पोहे आणि ठरवा ठरवी काय व्हायच ते होवूदे.
मी पर्स उचलली, वॉश रूम मध्ये जावून चेहरा स्वच्छ धुतला, केस नीट केले, पावडर वगैरे फासून, अ‍ॅट लिस्ट बाहेरून फ्रेश झाले आणि कॅन्टीन कडे निघाले
(क्रमशः)