Powered By Blogger

Sunday, July 22, 2012

पाकीट


"मित्राते फाटकं पाकीट कधी बदलतोयेस आता? "
"काय रे , काय सिल्वर ज्युबिली साजरी करायलयंस का काय त्या पाकीटाची? "
"काय, गिनीज बुकात नोंद करायची आहे का काय? "
"तुझा वाढदिवस कधी आहे तेवढा सांग बाबा, आम्ही सगळे एक छानसं पाकीटच गिफ्ट देतो"
"वाट मॅन, कुच अँटीक वालेट है क्या वो? "
"काय, लक्की पाकीट वाटतं?"
"अरे त्यातल्या पैशांचं सोड, तुझं लायसन्स, पॅन कार्ड, डेबिट कार्ड वगैरे त्यातून कधी पडलं तर केवढ्यात पडेल ते. कंजूष कुठचा"

माझ्या त्या कळकट्ट, जीर्ण आणि अगदी हॅवेल्स फॅन च्या जाहिरातीतील गलितगात्र झालेल्या राजेश खन्नासारख्या वाटणाऱ्या त्या प्रागैतिहासिक पाकिटाकडे पाहून एक ना अनेक जणांनी हे उद्गार अगणित वेळा काढले असतील.
तसं त्यात खोटं काही नव्हतंच म्हणा ना. बाहेरून उसवत आलेले धागे, आतले अगदी चिंध्या झालेले कप्पे, त्यात मधूनच डोकावणाऱ्या नोटा,काही बिनकामाच्या पावत्या, आणि माझ्यापेक्षाही भयानक दिसणारे माझे फोटो मिरवणारी ओळख कार्डं,भस्सकन ते खिशातून बाहेर काढले की समोरच्याला एकदम अंगावर आल्यासारखे होत असे.

जुन्या काळी पोस्टात खर्डॅघाशी करत करत घरात खाणाऱ्या दहा बारा तोंडांना पोसता पोसता मेटाकुटीला आलेल्या कारकूना सारखी
त्याची अवस्था झाली होती. पण मी मात्र एखाद्या हठयोग्याप्रमाणे कशालाच दाद देत नव्हतो. सगळयांच्या कॉमेंटस केवळ हसण्यावारी नेत, अगदी महाराणा प्रतापांच्या चेतकाप्रमाणे, ते मरणासन्न पाकीट मी खिशाशी बाळगून होतो.

तर, नुकतीच आमच्या टीम मध्ये, पुण्यातील एका नामांकीत मॉल्स ची कुपन्स वाटली होती. हो-नाही करत, शेवटी ह्या वीकांताला त्या मॉलमध्ये शिरलो. तसा अशा ठिकाणी खरेदीचा काहीच अनुभव गाठीशी नसल्याने मी भावाला बरोबर घेवून गेलो होतो.  मोठा आणि चकचकीत हॉल,सगळीकडे अगदी पद्धतशीरपणे मांडलेल्या विविध ब्रँडेड वस्तू, अगदी ब्रेसलेट,शूज पासून ते शेरवानी पर्यंत सगळाच माल डोळे फिरविणाऱ्या किंमती नाचवत उभा होता.

"अरे, हे पाकीट पाहा, छान दिसतंय. ", माझा भाऊ एका पाकिटांच्या स्टँडकडे बोट दाखवत म्हणाला.
"हम्म, पण माझ्याकडे पाकीट आहे की ऑलरेडी"
"नाही, ते काही कामाचं नाही. हे घेवून टाक, सातशे रुपयांना आहे फक्त, डिस्काउंट मिळून अजून स्वस्तात पडेल. "
सातशे रुपये?? मी विचार करू लागलो की सातशे रुपये एका वेळेस कधी मी पाकिटात तरी ठेवतो का?
पण नाही, ह्यावेळेस का कुणास ठाऊक, माझा विरोध पूर्णपणे गळून पडला आणि मी मुकाट्याने ते इटालिअन का कसल्या लेदरचे पाकीट विकत घेतलेच.

"आता, ते जुनं पाकीट दे फेकून. " भावाने पुस्ती जोडली.
मी नुसतंच हम्म करत बिल देवून टाकले.

घरी आल्यावर, त्या जुनाट पाकिटातून सामान काढताना मात्र हात चांगलाच जड झाला. माझं मन आपोआप सहा वर्षे मागं गेलं. मला आठवतं, कसंबसं इंजिनिअरिंग संपवून मी नुकताच नोकरीला लागलो होतो. नोकरीचा पहिलाच महिना चालू होता, त्यामुळे साहजिकच पहिला पगार वगैरे काही झालेला नव्हता. रोज, मी आईकडून, फक्त पी एम टी च्या तिकिटाइतके पैसे घेत असे. जेवणासाठी डबा घरून नेत असल्याने त्या पैशांचा प्रश्न सुटला होता. जाताना बस ने जाई, पण येताना ३-४ किलोमीटर चालत येत असे, तेवढेच पैसे वाचायचे. आता रोज तिकिटाचे पैसे घेतल्यानंतर ते पैसे ठेवायला अजून एखादं पाकीट घेणं म्हणजे त्या काळात खरोखर आमच्यासाठी चैन होती. मी खिशात नुसतेच पैसे ठेवायला घाबरायचो, कारण चुकून खिसा फाटका निघाला तर काय? पण त्यावरही मी एक उपाय शोधून काढला. माझा एक मामा नेहमी, घरातील रिकामी दुधाची पिशवी स्वच्छ धुवून, वाळवून, त्यात पैसे ठेवत असे. मीसुद्धा तेच सुरू केलं. मी कात्रज दुधाच्या रिकाम्या पिशवीतून पैसे नेवू लागलो.

एकदा माझ्या एका मित्राने मला असे पिशवीतून पैसे काढताना बघितलं. माझी परिस्थिती काही त्याच्यापासून लपलेली नव्हती. त्यानं माझी अडचण ओळखली आणि हळूच म्हणाला की, संध्याकाळी चल माझ्याबरोबर, तुला चांगलं पाकीट मिळवून देतो. मी त्याच्याकडून पैसे अजिबात घेणार नाही हे तर नक्की होतं. मी त्याला स्पष्ट सांगितलं की, बाबा रे, रोज चे बस चे पैसे वाचवून माझ्याकडे फक्त तीस रुपये साठलेले आहेत, आणि तेवढ्यात पाकीट मिळणार आहे का? तेव्हा, अरे तीस काय तुला तीन रुपयांत मिळवून देतो असं त्यानं छातीवर हात ठोकत सांगितलं.

संध्याकाळी, तो मला, कर्वे रोडवर, एसएनडीटी च्या ब्रिज खालच्या फूटपाथवर घेवून गेला. तिथे एक म्हातारा बऱ्याच गोष्टी विकत बसला होता, त्यांत पाकिटं सुद्धा होती.

"मामा, ते पाकीट कितीला दिलं? " मित्रानं विचारलं.
"तीस रुपये. ", गुटख्याची पिंक बाजूला टाकत म्हातारा बोलला.
"काय मामा, काय सांगता, पंधरा रुपये देतो बघा. "
"नाय वो, तेवडी खरेदी बी नाय. "
"असं नाही, बघा पंधरा रुपये देतो, नक्की सांगा"
"बरं चला, पंचवीस द्या. "
"नाही, पंधरा लास्ट".
"हे बगा, वीस लाष्ट, मी आता निगालोय घरी म्हनून देतो, घ्यायाचं असंल तर घ्या नायतर नाय. " म्हातारं आता चांगलंच वैतागलं होतं.
मित्राने मला खूण केली. मी वीस रुपये काढून दिले आणि ते पाकीट घेतलं. मित्रानंच दुधाच्या पिशवीतून पैसे काढून पाकिटात कोंबले आणि मला परत केलं. कृतज्ञता, येवढाच भाव माझ्या चेहऱ्यावर होता.
"थँक यू. " इतकंच कसंबसं माझ्या तोंडून निघून गेलं.
"अरे चल, मोठा आला, उद्या त्याच पाकिटातून पैसे काढून पार्टी घेणार आहे तुझ्याकडून. "

आणि, तेव्हापासून ते पाकीट अगदी इमाने इतबारे मला साथ देत राहिले. कधी कधी वस्तू नुसत्या वस्तू न राहता तुमच्याही नकळत तुमच्या अस्तित्वाचा भाग बनून जातात. खरेतर पाकीट ही एक क्षुल्लक वस्तू वाटू शकते, पण माझ्यासाठी ते पाकीट एक मोठं थँक्स होतं, त्या जुन्या दिवसांना ज्यांनी नुसतंच जगण्याचं बळंच नाही दिलं तर, हे सुद्धा शिकवलं की कशीही परिस्थिती असली तरी आनंदानं आणि समाधानानं जगण्यासाठी मन मोठं असावं लागतं, खिसा नाही. ते पाकीट एक रिमाइंडर होतं, ज्यानं यशाच्या, सुखाच्या अनेक प्रसंगांत कधी उतू मातू दिलं नाही, की अगदी अनेक अपयशांच्या, दुःखाच्या प्रसंगात खचू दिलं नाही. ते पाकीट म्हणजे एक मोठं सॉरी आहे माझ्या त्या मित्राला ज्याच्याशी मी पहिली कंपनी सोडल्यानंतर फारसा टच मध्ये राहू शकलो नाही. खरं तर त्या पाकिटात पैसे, कार्डं असं काही ठेवलंच नव्हतं कधी, ठेवल्या होत्या त्या फक्त आणि फक्त पैशांत कधीच किंमत न करत्या येण्याजोग्या आठवणी...


2 comments:

Sujay said...

उत्तम लेख. हा लेख वाचल्यानंतर मला ११ वीत असताना घेतलेले पाकीट आठवले. कोल्हापुरात महाद्वार रोडवर....किंमत १० रुपये...ते पाकीट माझ्याकडे अगदी परवा परवा पर्यंत होते....पण जुने पाकीट फेकून देताना हात जड होतात ह्यात शंका नाही...

लेख आवडला...!

- सुजय

Mahendra Kulkarni said...

आठवणी .. आठवणी.. आठवणी.. माणूस फक्त आठवणींवरच जगतो नाही का? छान लेख.