शनिवारी सकाळी सहा चा गजर वाजतो. मी डोळे किलकिले करत उठतो, आज गावाला जायला निघायचंय. आई नेहमीप्रमाणे माझ्याही आधी उठलीये. गाडी साडेनऊला आहे. मी तोंड धुवून नेहमीप्रमाणे ग्राऊंड वर जायचा विचार करतो आणि बूट चढवून निघतो.
"लवकर ये रे..", आई जवळजवळ ओरडतेच.
मला का कोण जाणे मागील ४-५ वर्षं न चुकता अगदी सकाळी सहा च्या ठोक्याला पळायला घेवून जाणार्या मित्राची आठवण येते. त्याच्यामुळेच तर ही एकच चांगली सवय लागली. गेले वर्षभर मात्र तो अमेरिकेत आहे. नुकतंच लग्न झालं त्याचं. परवाच फेसबूकावर फोटो पाहिला. माझ्यापेक्षाही बारीक असणारा आता माझ्या तिप्पट झालाय. पण अधून मधून न चुकता फोन करतो आणि प्रत्येक वेळेला व्यायाम सुटला रे चैत्या असा सुस्कारा सोडतो आणि मला मात्र सकाळचं पळणं सोडू नकोस असं कायम बजावतो. असो, चालायचंच.
मी राऊंड मारायला सुरूवात करतो. ग्राऊंड च्या बाजूचे रस्ते म्हणजे बेवारशी कुत्र्यांचे अड्डे आहेत. त्यातलंच एक कुत्रं विजेच्या खांबाला यथेच्छ अभ्यंगस्नान घालत असतं. दोन-तीन कुत्री फाटक्या बूटाच्या तुकड्यासाठी भांडत असतात. बाजूने दोन काकू भराभरा चालत अर्धं मराठी आणि अर्धं चुकीच्या इंग्रजीतून मोठमोठ्याने बोलत असतात. ग्राऊंड मधल्या एका बाकड्यावर एक कॉलेज मधलं कपल हातात हात घेवून बसलेलं असतं. मी पळता पळता आपोआप मोबाईल मध्ये तिचा नंबर पाहतो. मागच्या वर्षी काहीशा क्षुल्लक कारणावरून भांडण झाल्यानंतर तिचा फोन ही नाही आणि मेसेज ही नाही. मी सुध्दा, चल, गेलीस उडत च्या अविर्भावात काहीच भाव दिला नाही. तिचा नंबर मात्र अजून डिलीट करवत नाही. असो, चालायचंच.
अचानक एक ओळखीचं कुत्रं जोरात पळत पळत एका आजोबांचे पाय चाटायला लागतं. ते आजोबा त्याला बिस्कीट टाकतात आणि कुरवाळून पुढं जातात. गेली चार वर्षं त्या आजोबांना आणि कुत्र्याला पाहतोय. रोज ह्याच वेळेला ते त्याच कुत्र्याला बिस्कीटं टाकतात. आजोबा आज काल काठी टेकत टेकत चालतात. ते कुत्रं सुध्दा आता थोडं थकल्या सारखं दिसायला लागलंय. कदाचित ते सकाळ चं एक बिस्कीट दोघांनाही दिवसभरासाठीची ऊर्जा आणि उत्साह देत असेल. असो, चालायचंच.
मी आज राऊंड निम्म्यातच संपवून घरी परत जातो. पाच मिनिटांत आंघोळ करून आईने केलेले गरम गरम पोहे खातो. आईची नेहमीप्रमाणे अखंड बडबड चालू असते. त्यातलं काही मला समजतं, काही समजत नाही. आई खूप अशक्त दिसते आज काल. बाबा गेल्यानंतर आम्हा दोघा भावांचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिनं खूप सोसलं. डॉक्टरांनी आराम करायला सांगून सुध्दा तिचं दिवसभर काही ना काही सुरूच असतं. तिला येवढी एनर्जी मिळते तरी कुठून? असो, चालायचंच.
मी हातावर दही घेवून घरातून सटकतो. बस स्टॉप वर पोचत नाही तेवढ्यात स्वारगेट ची पी एम टी मिळते, ती सुध्दा चक्क मोकळी. आज कंडक्टर सुध्दा कसलीही कटकट न करता मला सुट्टे पैसे परत करतो. मी आश्चर्यचकीत पणे भरगच्च पीएमटीतून लटकत केलेल्या जीवघेण्या प्रवासांच्या आठवणींनी स्वतःशीच हसतो. बाजूचा माणूस, कोण वेडा आहे अश्या नजरेने माझ्याकडे पाहतो. असो, चालायचंच.
स्वारगेट वर सांगली-मिरज च्या फलाटावर जाऊन बसतो. आज जवळ जवळ तीन वर्षांनी सांगलीला जायला निघालोय आणि फलाटावर येताच लाऊड स्पीकर वर गाणं सुरू होतं .. संथ वाहते कृष्णामाई.. वा!! इतकंच माझ्या तोंडून निघून जातं. बराच वेळ झाला तरी सांगलीची कुठलीच गाडी येत नाही. बाजूच्या फलाटावरून कोल्हापूरच्या चार गाड्या इतक्या वेळात सुटल्या सुध्दा. कधी कधी करवीरकरांचा हेवा वाटतो, पुणे बेंगलोर हायवेवरून जाणार्या कुठल्याही गाडीत बसलं की झालं. असो, चालायचंच.
सांगली ची एक एशियाड मिळते. आज नशीब चांगलंच जोरावर दिसतंय. मोकळ्या बसमध्ये व्यवस्थित खिडकी जवळची जागा मिळते. मी विश्रामबाग चं तिकीट काढतो. दोनशे चौर्याण्णव रुपये. मला लहानपणी सगळ्यांनी मिळून केलेले सांगली-कोल्हापूर-जोतिबा प्रवास आठवतात. आजच्या इतक्या सारख्या बस नसायच्या तेव्हा. त्या प्रचंड गर्दीतून जाणं मला अक्षरशः नकोसं व्हायचं. सगळ्यांच्या तिकीटांचे पैसे जमवता जमवता बाबांचा जीव अगदी मेटाकुटीला यायचा. पण, सगळ्यांचं दर्शन व्हायलाच पाहिजे हा हट्ट. असो, चालायचंच.
नवीन कात्रज बोगद्यातून गाडी निघेपर्यंत माझा डोळा लागतो. अर्ध्या झोपेत पुढे प्रवास कसा होतो कळतच नाही. हायवेवर एका फालतू हॉटेल बाहेर गाडी थांबते. मी तोंड धुवून फ्रेश होतो आणि पुन्हा झोपतो. अचानक गार हवेच्या झुळुकेने जाग येते. बस आयर्विन पुलावरून जात असते. नकळतच कृष्णामाईला माझे हात जोडले जातात. आणि एकदम वारुळांतून मुंग्या बाहेर पडाव्यात तशा मनाच्या पुरचुंडीतून आठवणी बाहेर पडू लागतात.
एखादा दिवस असा उगवतो, जेव्हा जुन्या वहीत लपवलेलं पिंपळपान अलगद पणे बाहेर पडतं. त्या पानाला पडलेल्या जाळीतून जेव्हा तुम्ही आरपार पाहता तेव्हा पलीकडं एक स्फुट, वेगवेगळ्या शेड्स चं, थोडं अंधुक, थोडं स्पष्ट, थोडं नकोनकोसं आणि तितकंच हवंहवंसं एक कोलाज उमटंत जातं. ते पाहता यावं म्हणूनच कदाचित त्या पानाला जाळी पडत असावी. तुम्हाला आवडो, अगर न आवडो. असो, चालायचंच.